
सामना ऑनलाईन । सिंगापूर
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप, मलेशिया ओपन व इंडिया ओपन या स्पर्धांमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या पी.व्ही. सिंधूला बॅडमिंटन कोर्टवर झोकात पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. उद्यापासून सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत असून यामध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी ती सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.
या मोसमात बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद जिंकणारी सायना नेहवाल ही हिंदुस्थानची एकमेव खेळाडू ठरली आहे. स्पेनच्या कॅरोलीन मरीन हिने अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकता आली. आता तिच्यासमोर पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या होझमार्कचे आव्हान असणार आहे.
पुरुषांच्या एकेरीत ‘या’ खेळाडूंवर मदार
किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणीत, समीर वर्मा या स्टार खेळाडूंवर हिंदुस्थानची पुरुषांच्या एकेरीत मदार असणार आहे. प्रणव चोप्रा – सिक्की रेड्डी, अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी, मनू अत्री – बी. सुमीत रेड्डी यांना दुहेरीत चमक दाखवावी लागणार आहे.
























































