दहा दिवसांत मंदिरे उघडा, अण्णा हजारे यांचा ‘जेल भरो’चा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेलं सर्व उघडी केली आहेत. त्यामुळे सरकारने दहा दिवसांत मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. सरकारने मंदिरे उघडण्याबाबतचा निर्णय न घेतल्यास मंदिर बचाव कृती समितीने जेल भरो आंदोलन करावे. मी तुमच्यासोबत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बंद केलेली सर्व मंदिरे उघडावीत या मागणीसाठी नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेत निवेदन दिले. यावेळी अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली. तसेच मंदिरातून मिळणाऱया सात्त्विक विचारातून माणसे घडतात ती मंदिरे बंद करून सरकारने काय मिळवले, असा सवालही त्यांनी केला. भरकटत चाललेल्या समाजाला आज केवळ मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. आज मी जो काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच असल्याचे अण्णांनी सांगितले.