
प्रणय पाटील
राज्यातील शिक्षण खात्याच्या कारभाराचे अनेक नमुने उघडकीस येत असतानाच रायगड जिल्ह्याच्या मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, अलिबागमध्ये तर ‘शिक्षण विभागाच्या आयचा घो’.. झाला आहे. येथील शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रप्रमुखच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चारही तालुक्यांमध्ये केंद्रप्रमुखांची २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील शाळांचा कारभार वाऱ्यावर असून केंद्रप्रमुख म्हणून काम करण्यासाठी पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांना अधिक पसंती मिळत आहे.
शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद आहे. १० ते १२ शाळांमागे एका केंद्रप्रमुखाची नियुक्ती केली जाते. शिक्षकांमधूनच ही पदे भरतात. रायगड जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण २२८ पदे मंजूर असून त्यापैकी १८२ पदे भरली गेली आहेत. रिक्त पदांमध्ये मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, अलिबाग या चार तालुक्यांचा समावेश आहे. अलिबागमध्ये २२४, मुरुडमध्ये १०४, म्हसळा १०७ तर श्रीवर्धन तालुक्यात १०८ शाळा आहेत. चारही तालुक्यांमधील एकूण शाळांची संख्या ५४३ एवढी असून त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त २३ केंद्रप्रमुख सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे शाळांचा कारभार मनमानीपणे सुरू आहे.
केंद्रप्रमुख या पदाची नियुक्ती करताना अनेक शिक्षक पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर या तालुक्यांनाच विशेष पसंती देत आहेत. येथील सोयीसुविधा चांगल्या असल्याने केंद्रप्रमुख म्हणून काम करण्यासाठी अनेक जण लगेच तयार होतात.
पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूरमध्ये शंभर टक्के केंद्रप्रमुख उपलब्ध आहेत. त्या तुलनेने मुरुडमध्ये ४, म्हसळ्यात ५, श्रीवर्धनमध्ये ८ व अलिबाग तालुक्यामध्ये ९ अशी एकूण २७ पदे अजूनही भरलेली नाहीत.
मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन व अलिबागमध्ये केंद्रप्रमुखांची संख्या अतिशय कमी असून येथील शैक्षणिक प्रशासनाचा कारभार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या कामाचा भार अन्य अधिकाऱ्यांवर पडत आहे.
महत्त्वाची कामे
शिक्षकांना मार्गदर्शन
शैक्षणिक कामकाजावर देखरेख
शाळांना भेटी
शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणे
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी
आवश्यक ते नियोजन
शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात
रिक्त पदांचा तक्ता
रोहा- ३, मुरुड- ४,
तळा २, पोलादपूर- ३,
म्हसळा – ५, खालापूर- ०,
कर्जत- ०, सुधागड- १,
पेण- ४, माणगाव – ५,
महाड- २, उरण ०,
पनवेल- ०, श्रीवर्धन- ८,
अलिबाग – ९.






























































