
महाराष्ट्रात राहता इथे प्रगती करता मग मराठी भाषेला विरोध का करता. हे योग्य नाही. इथल्या मातीचे ऋण तुमच्यावर आहेत हे विसरू नका. महाराष्ट्रात राहायचे आणि मराठी भाषेला विरोध करायचा हा नैतिक द्रोह आहे. असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. शनिवारी मुंबईतील चर्नी रोड येथे मराठी भाषा भावनाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी मराठी द्वेष्ट्यांवर सडकून टीका केली.
अजित पवार पुढे म्हणाले कि मराठीचा द्वेष करू नका तर मराठीवर प्रेम करा मराठी पाट्या न लावणाऱ्यांना दुकानाची पाटी मराठीतच असावी अशी न्यायालयाकडूनच चपराक मिळाली. इथे कमावता आणि पैसे तुमच्या राज्यात पाठवता त्याबद्दल दुमत नाही. मात्र मराठी पाट्या लावायला सांगितल्यास ते तुमच्या पचनी पडत नाही.
यावेळी ते म्हणाले कि अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबात, मुलांना, मित्रांना मराठी वाचण्यास, लिहिण्यास व बोलण्यास प्रवृत्त करायला हवे तसेच त्यांना मराठी शिकवायला हवे. असे करूनही मराठीची उत्तम प्रकारे सेवा घडू शकते.
भूषण गगराणी यांच्या बद्दल गौरवोद्गार
मराठी भाषा विभागाचे अप्पर सचिव भूषण गगराणी हे मराठी भाषेमुळेच यशस्वी झाले आहेत. त्यांनी आयएएसची परीक्षा देखील मराठी माध्यमातून दिली. मराठी भाषा घेऊन ते देशात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. हि मराठी भाषेची ताकद आहे. त्यामुळे हे केवळ गगराणी यांचं यश नाही तर ते मराठी भाषेचं देखील यश आहे. महाराष्ट्रातील युवकांनी त्यांच्याकडून आदर्श घ्यायला हवा. मराठी बद्दल कोणताही न्यूनगंड बाळगू नका.





























































