चंद्राच्या अंधारावर ऑर्बिटर ‘प्रकाश’ टाकणार

485

चांद्रयान-2 मोहिमेत अंतिम टप्प्यात चंद्रावर लँडर विक्रम उतरवताना केलेला प्रयत्न फसला असला तरी या मोहिमेतील ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फिरत आहे. चंद्राभोवती परिभ्रमण करणारा हा ऑर्बिटर चंद्राच्या अंधार असलेल्या भागाची छायाचित्रे पाठवणार आहे. चंद्राची ही बाजू आजही जगासाठी अज्ञात राहिली आहे. त्यामुळे इस्रो आणि जगाच्या दृष्टीने या छायाचित्रांना मोठे महत्त्व असेल, असे इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी म्हटले आहे.

चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत फिरत असलेला इस्रोचा ऑर्बिटर हा लँडर विक्रम आणि त्यात असलेला रोव्हर प्रज्ञान यांच्याशीही जोडलेला आहे, मात्र चंद्रावर उतरताना सॉफ्ट लँडिंग होऊ न शकल्यामुळे विक्रम आणि प्रज्ञानबरोबर संपर्क तुटला. ऑर्बिटर चंद्रापासून 100 किलोमीटर अंतरावर त्याला नेमून दिलेल्या चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करत आहे. या परिभ्रमण कक्षेत फिरताना पुढील सात वर्षे चंद्राच्या अंधार असलेल्या भागाची छायाचित्रे तो पाठवणार आहे. दरम्यान, नासाचा ऑर्बिटरही मंगळवार, 17 सप्टेंबरला विक्रम जिथे पडला त्या जागेचा शोध घेऊन संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

ऑर्बिटर कोणते गूढ उकलणार

या ऑर्बिटरमध्ये चांद्रयान-1 मध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यापेक्षा अधिक दमदार असे स्पेक्ट्रल रेंजचे कॅमेरे आहेत. तसेच मायक्रोवेव डय़ुल फ्रिक्वेन्सी सेन्सर्सच्या मदतीने अंधार असलेल्या भागातील मॅपिंग करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ऑर्बिटरने पाठवलेल्या छायाचित्रांच्या मदतीने चंद्राचा आतापर्यंतचा विकास, पृष्ठभागाची रचना, खनिजे आणि पाणी उपलब्ध आहे का याचे गूढ उकलणे शक्य होणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या