
कोरोनामुळे लागलेल्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘चिरायू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी कलाप्रांतात भरीव योगदान देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकर्मींचा सन्मान करण्यात येणार आहे.
‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चिरायू’चे वैशिष्टय़ म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या अनेक कलाकर्मींची दखल या मंचावर घेतली जाते. कोरोना काळात गरजू रंगकर्मींच्या मदतीला धावणारे रंगमंच कामगार संघटनेचे प्रवक्ते रत्नकांत जगताप, रंगकर्मी सुमित गाडे, मेकअपमॅन प्रभाकर बारसे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कलादिग्दर्शक सुमित पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू जाधव तसेच चित्रपट महामंडळात काम करणाऱ्या लक्ष्मी परब यांचाही सन्मान केला जाणार असल्याची माहिती ‘चिरायू’ चे सुशांत शेलार यांनी दिली आहे.

























































