पाकिस्तानच्या इशार्‍यावरून शोभा डे यांचे देशविरोधी लिखाण, अब्दुल बासित यांचा खळबळजनक खुलासा

2412

सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद

वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी पाकिस्तानच्या सांगण्याकरून हिंदुस्थान सरकारविरोधी लेख लिहिला होता असा खळबळजनक खुलासा  हिंदुस्थानातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे. मात्र बासित यांनी केलेला आरोप पूर्णपणे खोटा असल्याचा दावा शोभा डे यांनी केला आहे.

दहशतवादी बुर्‍हान वाणी याच्या मृत्यूनंतर  पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी शोभा डे यांच्यासह इतर काही पत्रकारांची भेट घेतली होती. शोभा डे हिंदुस्थानविरोधात लेख लिहिण्यास तयार झाल्या. कश्मीरमधली परिस्थिती, बुऱहान काणीचा मृत्यू या सगळ्याबाबत पाकिस्तान सरकारच्या इशार्‍यावरून डे यांनी एक लेख लिहिला होता असा खुलासा आता अब्दुल बासित यांनी एका मुलाखतीत केला आहे.

यूएनबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर अमेरिका, रशिया, एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही.  त्यामुळे आता पाकिस्तानने अन्य देशांत राहणार्‍या नागरिकांना आणि कश्मिरींना हा मुद्दा जगभरात उचलण्यास सांगितले आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने करावी, पत्रव्यवहार करावा, असे आवाहन पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी केले आहे.

पाकिस्तानने दिली युद्धाची धमकी

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान चवताळले आहे. सतत बेजबाबदार वक्तव्ये करून पाकिस्तान हा मुद्दा पेटता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता तर हिंदुस्थानातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी युद्धाची धमकी दिली आहे. हिंदुस्थान जर मर्यादा ओलांडत असेल तर युद्ध केले पाहिजे अशी मुक्ताफळे बासित यांनी उधळली आहेत. अब्दुल बासित म्हणाले, कश्मीरचा मुद्दा चार मार्गानी लढता येईल. पहिला मार्ग म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा देता येईल. दुसरा मार्ग म्हणजे पाकिस्तानने व्यूहरचनात्मक डावपेच सुरू ठेवावे. तिसरा मार्ग आहे पाकिस्तानी, कश्मिरी प्रवाशांनी यासंदर्भात काम सुरू ठेवण्याचा आणि चौथा सर्वात महत्त्वाचा मार्ग  म्हणजे कश्मीरमधील राजकीय लढाई पाकिस्तानने कमकुवत करू नये.

आपली प्रतिक्रिया द्या