किडनी मिळवून देतो असे सांगत डायलिसिस रुग्णाची फसवणूक; पावणे दोन लाख रुपयांना घातला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिह्यातल्या वाशी तालुक्यातील बावी येथील डायलिसिस रुग्णाला खोटे बोलून गंडवल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. ’माझ्या खूप ओळखी आहेत, मी डॉक्टर आहे.. तुमच्या मुलाला लागणारी किडनी सरकारी योजनेमधून मिळवून देतो’ अशी बतावणी करत एका भामट्याने नात्यातीलच एका व्यक्तीस पावणेदोन लाख रुपयाला गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील बावी येथील परमेश्वर संदीपान सुतार यांचा मुलगा नितीन याच्या दोन्ही किडनी मागील 3 ते 4 वर्षांपूर्वी खराब झालेल्या आहेत. त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात नियमित पणे डायलिसिस केले जाते. सुतार यांचे नातेवाईक तसेच सर्वत्र डॉक्टर म्हणून मिरवत असलेले प्रदीप चतुर्भुज सुतार (रा.बार्शी, जि.सोलापूर) यांची व सुतार यांची भेट झाली.

यावेळी त्यांनी माझ्या खूप ओळखी आहेत व मी तुमच्या मुलाला किडनी मिळवून देतो. त्यामुळे ‘तुमचा डायलिसिसचा होणारा त्रास वाचेल व मुलगा बरा होईल’ सरकारी योजनेतून किडनी मिळेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. मुलासाठी किडनी मिळवून देतो असे बोलल्यामुळे व आपला मुलगा बरा होईल व किडनी देणारे हे आपले नातेवाईकच आहेत. यामुळे मुलास किडनी मिळवून देतील या आशेने सुतार यांनी 2018 साली प्रदीप सुतार यांना 1 लाख 79 हजार रुपये बार्शी येथे नेहुन दिले.

पैसे देऊन दोन ते अडीच वर्ष उलटली मात्र अद्यापही किडनी मिळाली नाही. तसेच पैसे घेणाऱ्यांकडून देतो-देतो असे उत्तर येऊ लागले यामुळे सुतार यांनी आमच्याकडुन घेतलेले आमचे पैसे तरी आम्हाला परत द्या, असे बोलले असता तुझे कसले पैसे? तुमचे तुम्ही बगा मला विचारू नका..! असे म्हणून शिवीगाळ केली. किडनी तर मिळालीच नाही आणि किडनी मिळेल या आशेने दिलेले आपले पैसे पण परत मिळत नाहीत व आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यामुळे परमेश्वर सुतार यांनी पोलीस ठाणे गाठले. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं 947 कलम 507 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास सपोफौजदार ठाकर हे करीत आहेत.