धाराशिव – जिल्हा परिषदेच्या शाळेत सिनेमाचे शूटिंग, विद्यार्थ्यांना उन्हात बसवल्याने पालकांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत उन्हात बसवण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेतील चित्रीकरणासाठी वरिष्ठांकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच चित्रपटकाचा ’आशय’ पाहता हेच संस्कार शिक्षक विद्यार्थ्यांवर करणार का? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी घडला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेरखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी शाळेच्या वेळेत सकाळी 10 वाजता ‘सविता’ नावाच्या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना बसवण्यात आले.

एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत पालक वर्गात होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कोरोना प्रतिबंधकात्मक नियमाचे पालन करीत शासनाने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, तेरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी बसवण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शासनाने कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या सुरक्षेच्या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सांगितले होते. मात्र, चित्रिकरणावेळी कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. विद्यार्थ्यांनो मास्क बाजूला करा, कृपया कोणीही मास्क घालू नका अशी सूचना संबंधित चित्रपटाचे निर्माते हे उपस्थित विद्यार्थ्यांना देत होते. निर्मात्यांच्याच तोंडाला मास्क नव्हता त्यामुळे निर्मात्यांना कोरोना बाबतचे गांभीर्य अजूनही लक्षात न आल्याचे उपस्थित लोकांतून बोलले जात होते.

सदरील चित्रिकरणाबद्दल गट शिक्षण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता, संबधित प्रक्राराबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. मी शाळेस बोलून आपल्याला कळवतो, मात्र हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असे वाशी येथील शिक्षण अधिकारी आर.एल. जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याऐवजी कोणत्याही चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी बसवणे हा प्रकार चुकीचा आहे. ’सविता’ नावाच्या चित्रटातून विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासरखे काय असेल? हा प्रश्न माझ्यासारख्या पालका बरोबरच इतर पालकांच्या देखील मनात येत आहे.
– गणेश घुले, पालक