ओस्तवाल बिल्डरची चारसोबिसगिरी उघड; परवानगी चार मजल्यांची, उभारले सात मजले

ओस्तवाल बिल्डर्सचे अनेक कारनामे उघडकीस येत असताना आता आणखी एका चारसोबिसगिरीचा पर्दाफाश झाला आहे. चार मजली इमारत बांधण्याची परवानगी असतानाही बेकायदा कागदपत्रे तयार करून या बिल्डरने सात मजल्याच्या आठ इमारती उभारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. फसवेगिरी करणारा उमरावसिंह ओस्तवाल हा बिल्डर व त्याचा आर्किटेक मुलगा कुलदीप ओस्तवाल या दोघांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेसर्स ओस्तवाल बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भाईंदरमधील शिवार गार्डनसमोर २००५ साली ओस्तवाल पॅराडाईज कॉम्प्लेक्स उभारले. त्यात अनेक मध्यमवर्गीयांनी कर्ज काढून घरेदेखील घेतली. २००८ मध्ये रहिवाशांनी सोसायटी स्थापन केली. कन्व्हेअन्स डीड करण्याची वेळ आली तेव्हा बिल्डरने टाळाटाळ केली. कागदपत्रांची जमवाजमव सोसायटीने सुरू करताच आठही इमारतींना फक्त चार मजले उभारण्याची परवानगी असल्याची बाब उघडकीस आली.

सोसायटीच्या चेअरमनने केली तक्रार
ओस्तवाल पॅराडाईज कॉम्प्लेक्समधील पाच, सहा व सात हे वाढीव मजले बेकायदा असल्याचे निदर्शनास येताच सोसायटीचे चेअरमन रंजित झा यांनी नयानगर पोलीस ठाणे गाठले व फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बिल्डर उमरावसिंह ओस्तवाल व आर्किटेक्ट कुलदीप ओस्तवाल या दोघा पितापुत्रांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.