ओटीटीवर स्टार पॉवरचा खेळ, मागेल तेवढे मानधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात ओटीटी हे माध्यम आता विस्तारू लागलं आहे. त्यामुळेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत. ओटीटी बाजारात जम बसवण्यासाठी बॉलिवूडच्या सुपरस्टार्सला मागेल तेवढे मानधन दिले जात आहे. जेवढे नाव मोठे तेवढा दाम मोठा.

अजय देवगणला एका वेबसिरीजसाठी 125 कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा आहे. याआधी अक्षयकुमारलाही 90 कोटींची ऑफर मिळालेली आहे. दुसरीकडे मनोज वाजपेयीला ‘फॅमिली मॅन-2’नंतर 20 ते 22 कोटीपर्यंतची ऑफर मिळाल्याचे समजते. ओटीटीचे स्वतŠचे स्टार असताना आता त्यांना बॉलिवूडच्या मोठय़ा स्टारची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे ओटीटीवरसुद्धा बॉलिवूडसारखी स्टार सिस्टीम सुरू होतेय की काय, अशी चर्चा आहे.

सध्या मोठमोठे बॉलिवूड स्टार ओटीटीकडे वळले आहेत. शाहीद कपूर, माधुरी दीक्षित, जुही चावला, आयेशा झुल्का, सोनाक्षी सिन्हा आणि रवीना टंडन या वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत. याआधी अनिल कपूर, प्रियांका चोप्रा यांनीदेखील काम केले आहे. ही नावे येत्या काळात वाढत गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

टेलिव्हिजनने पाडला पायंडा

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या माध्यमातून सोनी टीव्हीसाठी गेमच बदलला. सलमान खाने ‘बिग बॉस’ तर आमीरने ‘सत्यमेव जयते’ शो केले. टेलिव्हिजनवर झाला तोच स्टार पॉवरचा गेम आता ओटीटीवर दिसणार आहे.

  • देशात ओटीटीचे पेड सबस्क्रायबर्स 3 ते 5 कोटी आहेत.
  • 10 भागांच्या वेबसिरीजसाठी मध्यम श्रेणीच्या स्टारला 1 ते 3 कोटी तर मोठय़ा स्टारला 3 ते 7 कोटी रुपये मानधन मिळते.
  • नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार यांच्याजवळ निधीची कमी नाही. नेटफ्लिक्स एका महिन्यात कमीत कमी 200 कोटीचे प्रोजेक्ट लाँच करते. त्यामुळे सुपरस्टारला द्यायला 100 ते 125 कोटी त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही.
  • ट्रेड अनालिस्ट गिरीश वानखेडे यांच्या मते, ओटीटीला पंकज त्रिपाठी आणि प्रतीक गांधीसारखे स्टार आहेत. मात्र सबस्क्रायबर्स जर वेगाने वाढवायचे असतील तर अजय देवगण, अक्षयकुमार यांच्यासारखे सुपस्टार हवेत.