देशातील शेतकऱयांची अवस्था इंग्रजांच्या काळापेक्षाही भयानक; पी. साईनाथ यांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात इंग्रजकाळात ज्याप्रमाणे शेतकरी दबला आणि पिचला गेला होता, त्यापेक्षा अधिक भयावह अवस्थेतून सध्या देशातील शेतकऱयांना जावे लागत आहे. सरकार कोणाचेही असो, संसदेत शेतकऱयांच्या प्रश्नावर एक दिवसही चर्चा होत नाही. प्रसारमाध्यमेही बडय़ा भांडवलदारांच्या खिशात गेल्यामुळे शेतकऱयांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिला आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पी. साईनाथ यांनी शेतकरी, प्रसार माध्यमे आदी मुद्दय़ांवर भाष्य केले. ते म्हणाले, हिंदुस्थान पृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱयांना न्यायासाठी सातत्याने झगडावे लागते. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर झालेले शेतकऱयांचे आंदोलन हे देशातील सर्वाधिक ताकदीचे आणि यशस्वी आंदोलन आहे. या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे शेतकऱयांच्या दृष्टीने काही स्वर्ग नाहीत. त्या तर सरकारच्या इशाऱयावरच चालतात. शेतात प्रत्यक्ष राबणाऱया शेतकऱयांची संख्या मोठी आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळाल्यास देशातील अनेक समस्या सुटू शकतात. समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे शेतात राबणाऱया स्त्रियांच्या कष्टाचीही दखल घेतली जात नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात झगडण्याची मानसिकता शेतकऱयांना ठेवावी लागणार आहे, असे मत साईनाथ यांनी व्यक्त केले.

कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रे बाधित होऊन आर्थिकदृष्टय़ा नुकसानीत गेली. परंतु याच कोरोनाकाळात अंबानींच्या वैयक्तिक उत्पन्नात दुपटीने वाढ होते. हे कशाचे लक्षण आहे? अंबानींनी अनेक माध्यम संस्था विकत घेऊन खिशात घातल्या आहेत. या माध्यम संस्था मालकांशीच इमानी राहणार आणि त्यांचीच री ओढणार, यात नवल नाही. परंतु अशा बडय़ा भांडवलदारांशी संबंध नसलेल्या माध्यम संस्थाही जाहिरातींच्या लालसेपोटी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत, याकडेही साईनाथ यांनी लक्ष वेधले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी, प्रा. विलास बेत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.