
मराठी रंगभूमीवर काही नाटके केवळ लोकप्रिय ठरत नाहीत, तर ती इतिहास घडवतात. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे असेच एक अजरामर नाटक आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन ज्येष्ठ नाट्यकर्मी मधुकर तोरडमल यांनी केले असून, त्यांनी साकारलेली इरसाल प्रा. बारटक्के ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात ताजी आहे.
या नाटकाबाबत एका समीक्षकाने केलेली टीका मात्र उलट परिणाम घडवणारी ठरली. ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषतः पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात पाहू नये,’ असे विधान प्रसिद्ध झाले. परिणामी रसिकांची उत्सुकता प्रचंड वाढली आणि सुशिक्षित महिला व तरुणींनी नाटक हाऊसफुल्ल करण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या.
प्रा. मधुकर तोरडमल यांच्यासह अरुण सरनाईक, आशालता अशा दिग्गज नटांच्या सहभागातून या नाटकाचे प्रयोग झाले. सुरुवातीला चंद्रलेखा या संस्थेतर्फे प्रयोग झाल्यानंतर, मधुकर तोरडमल यांच्या ‘रसिकरंजन’ नाट्यसंस्थेतर्फे या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग झाले. त्यानंतर इतर नाट्यसंस्थांनीही हे नाटक रंगभूमीवर सादर केले. अखेर २०१४ साली मधुकर तोरडमल यांच्या उपस्थितीत या नाटकाचा संयुक्त पाच हजारावा प्रयोग साजरा झाला. आता २०२६ मध्ये राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली नव्या संचात हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे.
























































