पैशांचा पाऊस भाग ३७- माहिती आणि कागदपत्रांचे स्मार्ट व्यवस्थापन

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

गेल्या दिवाळीच्या तोंडावर माझे एक ग्राहक श्री. शिंदे यांचा फोन आला. “काही कागदपत्रांच्या बाबतीत उद्या भेटायला जमेल का?” मी हो सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता बरोबर ठरलेल्या वेळेनुसार श्री. शिंदे ऑफिसमध्ये आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मूळ विषयाला हात घातल्यावर त्यांनी पिशवीतून आणलेली कागदपत्रे समोर ठेवली. ६ महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. ही कागदपत्रे त्यांना त्यांच्या वडिलांच्या ट्रंकमध्ये मिळाली. जेव्हा ती कागदपत्रे पहिली तेव्हा लक्षात आले जवळपास ९-१० कंपन्याचे शेअर्स सर्टिफिकेट त्यातील काही कंपन्या आता बंद झाल्या होत्या. श्री. शिंदे यांचे वडील चांगले शिकलेले. एका प्रिंटिंग प्रेसमध्ये अकाउंटंट होऊन निवृत्त झाले. शिंदेही नामांकित बँकेत चांगल्या हुद्द्यावर होते. पण तरीसुद्धा इतका निष्काळजीपणा कसा हा प्रश्न मला पडला? या सर्व कागदपत्रांची किंमत जवळपास 7 लाख इतकी होती. पण त्यासाठी आता खूप कायदेशीर प्रक्रिया करावी लागणार होती. असे का होते? आज कोणतीही गुंतवणूक करताना आपण भविष्यातील काही ध्येयं समोर ठेवतो. पण या गुंतवणुकीची कागदपत्रे किंवा पुढील व्यवस्थापन करताना आपण निष्काळजीपणा करतो.

नेहमीचे आयुष्य जगताना आपण आपल्या उत्तम भविष्यासाठी झटत असतो. नोकरी-धंद्यामधील वाढलेली स्पर्धा, वेळोवेळी महागाईला तोंड देत आणि सुधारलेल्या राहणीमानाचा समतोल साधत भविष्यासाठी उत्पन्नातील ठराविक वाटा बाजूला काढून तो योग्य प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. गुंतवणूकीबरोबरच स्वतःसाठी आणि परिवारासाठी विमा घेणे त्याचे वेळेवर हफ्ते भरणे. आर्थिक ध्येयासाठी महिन्याला कधी वर्षाला गुंतवणूक करणे याची माहिती योग्य प्रकारे ठेवणे, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे, कधीच वेळेला मिळत नाहीत, असे तुमच्या घरी होते का? होते ना? कारण आपल्याकडे त्याचे योग्य व्यवस्थापन नाही. आज आपण या कागदपत्रांचे स्मार्ट नियोजन कसे करायचे ते पाहूया.

१. सर्व कागदपत्रे यांची पुढील प्रकारे विभागणी करून घ्या.
२. पुढील प्रमाणे विभागणी आणि त्यानुसार फाईल करा.-

१. शैक्षणिक कागदपत्रे
२. स्थावर मालमत्तेची कागदपत्रे
३. विमा कागदपत्रे
४. गुंतवणुकीची कागदपत्रे
५. कर्जविषयक कागदपत्रे
६. नोकरी-धंद्याची महत्वाची कागदपत्रे.

३.वरील प्रमाणे ६ फाईल चे २ गट करा म्हणजे एकूण १२ फाइल. १ गटामध्ये सर्व मुख्य कागदपत्रे आणि दुसऱ्या गटामध्ये या सर्वांच्या कॉपी काढून ठेवा. जेणेकरून मूळ फाईल गहाळ झाल्यास आपल्याकडे कॉपी फाईल असेल.

४. या केलेल्या ६ फाईल मधील ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून किंवा फोटो काढून पेन ड्राईव्ह आणि ऑनलाईन फोल्डर मध्ये सेव्ह करून ठेवा.

५. तुमच्या पत्नी किंवा पतीला आणि घरातील मोठ्या मुलांना ही सर्व प्रक्रिया करताना सोबत घ्या. जेणेकरून ही माहिती सर्वांना असेल.

६. महत्त्वाच्या व्यक्तींचे आणि कार्यालयांचे संपर्क यांची यादी करून घ्या. जसे की आर्थिक नियोजनकार, विमा प्रतिनिधी, शेअर ब्रोकर इत्यादी

७. विमा संरक्षणाबद्दल परिवाराला योग्य माहिती द्या आणि विमा प्रतिनिधीकडून विम्याची रक्कम कशी मिळवायची याबद्दल माहिती घ्या आणि ती परिवाराला समजावून सांगा.

८.आपल्या जवळच्या विश्वासू नातेवाईकाला किंवा मित्राला आपल्या आर्थिक जीवनाबद्दल पुरेशी माहिती द्या.

लक्षात घ्या, आज स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा तुमचा प्रवास हा तुम्ही नसताना सुद्धा चालू राहणार आहे. त्या वेळेस आपल्या परिवाराला कोणत्याही आर्थिक प्रक्रिया त्या सहजरित्या पार पाडता आल्या पाहिजेत जेणेकरून श्री.शिंदेंवर जी वेळ आली ती आपल्या परिवारावर नाही आली पाहिजे. अनुभवातून शिकतो तो खरा माणूस आणि दुसरीच्या अनुभवावरून शिकतो तो खरा स्मार्ट माणूस हो ना? मग चला या उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवस बाजूला काढून आपली कागदपत्र कोणत्या ट्रंकेमध्ये कोणत्या जुन्या पिशवीत कोंबून ठेवली आहेत ते पाहूया आणि त्याचे स्मार्ट व्यवस्थापन करूया.