पैशांचा पाऊस भाग ३९- आर्थिक नियोजन आणि सहजीवन

135

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

आपले सर्वांचे आर्थिक जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. हो ना? प्रश्न हा आहे की याबाबाबत तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आताच्या आर्थिक परिस्थतीबद्दल रडत बसणार आहेत किंवा इतरांना दोष देत बसणार आहात? तुम्हाला जर तुमचे आर्थिक जीवन एका उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर तुम्हाला संपत्ती निर्माण करावी लागेल. तुमच्या भविष्याचा ताबा मिळवण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला वाढवावे लागतील आणि अनावश्यक खर्चांना नियंत्रित आणावे लागतील आणि तेही आजच! हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पतीपत्नी दोघांमध्ये आपल्या आर्थिक जीवनाबद्दल स्पष्ट चित्र तयार आहे.

गेल्या ३ वर्षांत आम्ही जवळपास २०० परिवाराचे आर्थिक नियोजन करून दिले आणि त्यामध्ये आम्हाला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे “जोपर्यंत पती आणि पत्नीमध्ये स्वतःच्या आर्थिक जीवनाबद्दल एक वाक्यता येत नाही तोपर्यंत ते त्यांची भविष्यातील आर्थिक ध्येय गाठू शकत नाहीत” कारण बहुतेक वेळा जेव्हा आम्ही दोघांना समोर बसवून आर्थिक ध्येयाबद्दल विचारतो तेव्हा पुढील अनुभव येतात.

घर घेणे हे जवळपास ६०% आर्थिक नियोजनामध्ये असलेले ध्येय असते. जेव्हा पती १ बीएचके घेण्यासाठी नियोजन करत असतो त्या वेळी पत्नीला २ बीएचके घ्यावासा वाटत असतो (आर्थिक परिस्थितीबद्दल स्पष्टता नसल्यामुळे किंवा जवळच्या कुणाशी तरी असलेल्या ईर्षेमुळे) पत्नी पै नि पै साठवणारी असते तर पती खर्चिक किंवा याच्या उलट अस, त्यामुळे खटके उडत असतात. पतीला मोठी गाडी घ्यावीशी वाटते तर पत्नीला एवढी महागडी गाडी नको असे म्हणणे असते.

वरील उल्लेखलेले प्रसंग हे आम्हाला आलेले अनुभव आहेत आणि तुम्हीही असे वाद किंवा असे मतभेद स्वतःच्या कुटुंबात झालेले पहिले असतील. हो ना? यातून काय साध्य होत माहीत आहे का तुम्हाला? तर काहीच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही एकमेकांच्या आवडी-निवडी, एखाद्याचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करून एक स्पष्ट ध्येय ठरवत नाही, तोपर्यंत ते ध्येयच होऊ शकत नाही. जिथे ध्येय नाही ते साध्य होणारच कसे?

आपण जेव्हा सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचे नियोजन करतो तेव्हा असे मतभेद असतात का? पतीला वाटतंय केरळला जाऊया आणि पत्नीला वाटतंय हिमाचलला जाऊया. अशा परिस्थितीमधे तुम्ही नियोजन करू शकता का? घराबाहेर निघू शकता का? नाही ना? आणि पत्नीने जबरदस्ती हिमाचल जाणे ठरवले तर पती त्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतो का, नाही ना? असेच काहीतरी आपल्या आर्थिक जीवनाचे असते आणि अशावेळी ज्याप्रमाणे आपण हिंदुस्थानी आपले वैवाहिक जीवन एकमेकांना समजून घेऊन व्यतीत करतो तसेच आर्थिक जीवनातही एकमेकांना समजून घेणे आले, तडजोड आली आणि यातूनच पुढील आर्थिक भविष्याचा वेध घेता येईल.

लक्षात ठेवा पती आणि पत्नीही बैलगाडीची दोन चाके आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा समतोल, सामान वेग, असायला हवा. जेणेकरून आयुष्याच्या उत्तरार्धात अमिताभ-हेमा मालिनीसारखे बागबान होण्याची वेळ आणू नका. मुले मोठी होतील, स्वतःच्या विश्वात रममाण होतील, तेव्हा तुमच्याकडे १ बीएचके आहे की २ बीएचके यापेक्षा एकमेकांना कसे समजून घेतलेत, एकमेकांच्या इच्छांसाठी कशाप्रकारे मेहनत केलीत, याला जास्त महत्त्व असेल. हो ना?

summary- paishancha paus part 40 by mahesh chavan

आपली प्रतिक्रिया द्या