
सामना ऑनलाईन । जोधपूर
पायाभूत सुविधा, विकासाचा मुद्दा यांसह सामाजिक समीकरणांवर देशातील निवडणुका लढविल्या जात असतात. राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंची संख्या मोठय़ा प्रमाणावर असून त्यांची ‘पाकिस्तानी हिंदू व्होट बँक’ तयार झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी या व्होट बँकेची आवर्जून दखल घेतली असून लोकसभा निवडणुकीत या समूहाला प्रथमच वेगवेगळी आश्वासने दिल्याचे आढळून येत आहे.
पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक आहेत. मुस्लिमांकडून होणाऱया अत्याचारामुळे पाकिस्तानातील हिंदू स्थलांतर करून हिंदुस्थानात आश्रय घेतात. गेल्या काही वर्षांत या स्थलांतरित हिंदूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. राजस्थानच्या सीमेवरील जोधपूर, बारमेस जैसलमेर, बिकानेर या जिह्यांमध्ये आजवर पाच लाख पाकिस्तानी हिंदू लोकसंख्या आहे. त्यांपैकी दोन लाख लोकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे.
पाकिस्तानी हिंदूंची वाढती संख्या ध्यानात घेऊन त्यांना राजकीय पक्ष लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना वीज-पाणी या मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहे.
दोन लाख मतदार
जोधपूरमध्ये 20 हजार पाकिस्तानी हिंदू मतदार आहेत, तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील पाकिस्तानी हिंदूंची संख्या दोन लाखांवर गेली आहे. येथे तिसऱया टप्प्यात आज मतदान झाले. त्यामुळे पाकिस्तानी हिंदूंच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. काँग्रेसने त्यांना वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह शिक्षण देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे तर भाजपची हिंदुत्व विचारसरणी असल्यामुळे पाकिस्तानी हिंदूंना व्होट बँक मानले जात आहे. या एकगठ्ठा मतदारांना आकर्षिक करण्याचे प्रमुख पक्ष नेहमी प्रयत्न करतात.
सात वर्षांनंतर मिळते नागरिकत्व
राजस्थानच्या सीमेवर येणाऱया पाकिस्तानी हिंदूंचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढतच आहे. या हिंदूंना देशात 7 वर्षे राहिल्यावर हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले जाते. तोपर्यंत या नागरिकांना व्हिसाच्या मुदतीत वाढ करीत राहावे लागते. स्थलांतरित हिंदू प्रारंभी मूलभूत सुविधा नसलेल्या तात्पुरत्या छावण्यांत राहतात. त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे प्रशासनाकडे नाव नोंदविताना अनेक अडचणींना सामोर जावे लागते. या हिंदूंसाठी सामाजिक कार्यकर्ते हिंदूसिंग सोधा हे एक सामाजिक संस्था चालवीत आहेत.


























































