
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकव्याप्त कश्मिरात पाकिस्तानचं सैन्य हिंदुस्थानविरोधी वातावरण तयार करत आहे. त्यासाठी पाकिस्तान पाकव्याप्त प्रदेशातील नागरिकांना आत्मघाती हल्ल्याचं प्रशिक्षण देत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा दावा पाकव्याप्त कश्मीरमध्ये काम करत असलेल्या एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षानेच केला आहे.
जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचं 40वं सत्र सुरू आहे. या परिषदेत यूनायटेड कश्मीर पिपल्स नॅशनल पार्टीचे अध्यक्ष शौकत अली यांनी पाकिस्तान दहशत पसरवत असल्याचं म्हटलं आहे. पाकव्याप्त कश्मिरात पाकिस्तानी सैन्य दहशत माजवत आहे. तेथील नागरिकांच्या आडून पाकिस्तान हिंदुस्थानच्या विरोधी कारवाया करत आहे. येथील नागरिकांना छोट्या हत्यारांऐवजी आत्मघाती हल्ल्यांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे निवृत्त अधिकारी काम करत आहेत, असा दावा शौकत अली यांनी परिषदेत केला आहे.
इतकंच नव्हे तर पाकिस्तान धर्म आणि दहशतीला हत्यारासारखं वापरतो. दहशतवाद हा कोणालाही लाभदायक नाही. याच कारणांमुळे पाकिस्तानची जगात नाचक्की झाली असून त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत, असंही अली यांचं म्हणणं आहे. पाकव्याप्त कश्मिरात काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते मिसफर हसन यांनीही पाकिस्तानच्या दहशतवादाबद्दल आपलं मत या परिषदेत मांडलं आहे. गेल्या 71 वर्षांपासून हे सर्व सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन अणुशक्तीने संपन्न असलेल्या ताकदींना युद्धाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं आहे, असं हसन यांचं म्हणणं आहे.



























































