
पाकिस्तानातील बहुतांश क्रिकेटपटू वयचोरी करतात, असा घरचा आहेर माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने केला आहे. पाकिस्तानी गोलंदाज असतात 27-28 वर्षांचे आणि बनावट जन्मदाखला तयार करून सांगतात 17-18 वर्षांचे, असा खळबळजनक आरोपही त्याने केला आहे.
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलसह यू टय़ूब शोमध्ये बोलताना 38 वर्षीय मोहम्मद आसिफने आपल्या देशाच्या क्रिकेटपटूंची पोलखोल केली. तो म्हणाला, अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची पार रया गेली. 5-6 वर्षे झाली असतील, एकाही पाकिस्तानी गोलंदाजाने एका कसोटी सामन्यात 10 बळी टिपलेले नाहीत. पाच-सहा षटके टाकल्यानंतर या नव्या दमाच्या गोलंदाजांना धड क्षेत्ररक्षणासाठीही उभे राहता येत नाही इतकी त्यांची दमछाक होते. गोलंदाजी करताना योग्य प्रमाणात शरीर वाकवायचेही ज्ञान त्यांना नाही. विकेटवर गोलंदाजी करताना त्यांचा चेंडू लेग साइडला जातो. आताच्या गोलंदाजांमध्ये फारसा कंट्रोल दिसत नाही, अशी खंतही आसिफने व्यक्त केली.




























































