पाकिस्तान- कराची अपघातातील अवशेषांमध्ये सापडले तीन कोटी रुपये

3714

पाकिस्तान येथील कराचीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत 97 जण मृत्युमुखी पडले. या अपघाताच्या अवशेषांमध्ये तीन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कराची येथे विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर त्याचे अवशेष हटवण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी तिथे नीट तपासणी करण्यात येत होती. अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये प्रवाशांचं सामान राहिलं असल्यास त्याचा शोध घेण्यात येतो आणि ते त्यांच्या वारसांकडे सुपूर्द करण्यात येतं. त्यानुसार, अवशेषांना हटवण्याचं काम सुरू असतानाच अधिकाऱ्यांना दोन थैल्या सापडल्या.

त्या थैल्या जड असल्याने त्या उघडण्यात आल्या आणि उघडून बघितल्यानंतर अधिकारी थक्क झाले. कारण, त्यात विविध देशांच्या चलनी नोटा आणि नाणी होती. त्यांची किंमत तीन कोटी इतकी असल्याची माहिती मिळत आहे. विमानतळावर इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना अशा प्रकारे परकीय चलन विमानात कसं आलं, या प्रश्नाने सध्या पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.

23 मे रोजी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे A320 हे लाहोरवरून कराचीला जाणारे विमान जीन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होत असताना कोसळले. या दुर्घटनेत 97 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण चमत्कारिकरित्या बचावले. हे विमान एका मोठी लोकसंख्या असलेल्या भागात कोसळले होते.

आपली प्रतिक्रिया द्या