
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
निवडणुकीपूर्वी दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकण्याची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सत्तेवर येताच दहशतवाद्यांसाठी पायघडय़ा (रेड कार्पेट) अंथरायला सुरुवात केली आहे. इम्रान सरकारने मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दवा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वरील बंदी उठवली.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी अध्यादेश जारी करून हाफिजच्या संघटनांवर बंदी आणून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. हुसैन यांनी अध्यादेश काढून संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या काळय़ा यादीतील हाफिज सईदच्या ‘जमात-उद-दवा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’वर बंदी घातली होती.
बंदीचा अध्यादेश अवैध असल्याचे हाफिजचे प्रतिपादन
जमात-उद-दवावरील बंदीच्या अध्यादेशावर विद्यमान सरकारने कारवाई केलेली नाही त्याचा संदर्भ देत हाफिज सईदने इस्लामाबाद कोर्टात याचिका दाखल केली होती. पाकिस्तानातील तहरीक-ए-इन्साफ सरकारने या अध्यादेशावर कारवाई केली नाही, त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे हा अध्यादेश अवैध असल्याचे हाफिजचे वकील रिजवान अब्बासी आणि सोहेल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. हा अध्यादेश पाकिस्तानची एकात्मता आणि संविधानाच्या विरोधी असल्याचेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते. हा अध्यादेश सध्याच्या सरकारने पुढे आणलाच नाही. त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी तो संसदेसमोरही ठेवला नाही, असेही हाफिजच्या वकिलाने कोर्टासमोर स्पष्ट केले



























































