कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा फेरविचार करणार

कुलभूषण जाधव प्रकरणात हिंदुस्थान अवमान खटला दाखल करेल या भीतीने पाकिस्तानची चांगलीच टरकली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत पाकिस्तान कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करणार आहे.

पाकिस्तानच्या संसदीय समितीने यासंदर्भातील विधेयकाला बुधवारी मंजुरी दिली. विधेयकावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. मात्र विधी व न्याय विभागाच्या स्थायी समितीने विरोधकांना न जुमानता विधेयक मंजूर केले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या गेल्या वर्षीच्या आदेशाला अनुसरून आपण हे विधेयक सादर केले आहे. संसदेने जर या विधेयकाला मंजुरी दिली नाही, तर पाकिस्तानला जागतिक पातळीवर त्याचे परिणाम भोगावे लागतील. अनेक प्रतिबंधांचा सामना करावा लागेल, असे पाकिस्तानच्या न्याय आणि विधी मंत्री फरोग नसीम यांनी स्पष्ट केले.

स्थायी समितीतील चर्चेवेळी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमीयत उलेमा -ए-इस्लाम या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधेयक फेटाळण्याची मागणी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष रियाज फत्याना यांच्या संमतीने मतदान घेऊन विधेयक मंजूर करण्यात आले. आठ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने, तर पाच सदस्यांनी विरोधात मतदान केले.

नेमके काय प्रकरण आहे?

2016 मध्ये पाकिस्तानात हिंदुस्थानचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. नंतर तिथल्या सैन्य न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्या निकालाला हिंदुस्थानने आव्हान दिले. त्यावर जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दणका दिला. कुलभूषण यांना फाशी सुनावण्याच्या निकालाचा फेरविचार करण्याचा आदेश न्यायालयाने पाकिस्तानला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या