
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची चांगली तंतरली आहे. पाकडे कितीही खुमखुमी दाखवत असले तरी ते किती हतबल झाले आहेत, ते पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. जगभर हिंदुस्थानवर विजय मिळवल्याचे खोटे दावे पाकडे करत आहे. मात्र, त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देशाची बिकट आर्थिक स्थिती लपवू शकत नाहीत. ते अनेकदा सार्वजनिकरित्या त्यांच्या देशाचे वास्तव स्वीकारत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसमोर आर्थिक स्थितीमुळे हतबलता दर्शवली आहे.
जेब में नही आना, घर में नही दाना! आता मित्रही भीक घालेना, अशी देशाची परिस्थिती झाल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे जवळचे आणि पारंपारिक मित्र देशही आता पाकिस्तानला मदत देऊ इच्छित नाहीत. ऑपरेशन सिंदूरनंतर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी सैनिकांना संबोधित केले. मात्र, सैनिकांचे मनोबल वाढवण्याऐवजी त्यांनी स्वतःची आणि देशाची हतबलता व्यक्त केली.
शाहबाज शरीफ म्हणाले की, चीन आमचा जुना मित्र आहे, सौदी अरेबिया हा सर्वात विश्वासार्ह भागीदार आहे आणि तुर्की, कतार, युएई हे देखील आमचे विश्वासू मित्र आहेत. तथापि, आता या देशांच्या आपल्याकडून अपेक्षा बदलल्या आहेत. ते आता व्यापार, नवोपक्रम, संशोधन, शिक्षण, आरोग्य आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रात आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करत आहेत. आता त्यांना आम्ही प्रत्येक वेळी भिकेचा कटोरा घेऊन त्यांच्याकडे जावे असे वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी हतबलता व्यक्त केली.
पाकिस्तानला नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र, शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानची आर्थिक कमकुवत स्थिती स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून भीकेचा कटोरा घेऊन आपल्याला जगभर फिरायचे नाही, असेही ते म्हणाले.





























































