
काही देश सीमेपलीकडे दहशतवाद्यांचा वापर त्यांच्या स्टेट धोरणाप्रमाणे करत आहेत. हे देश दहशतवाद्यांना आश्रय देतात, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुनावले.
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद व्हर्च्युअली आज पार पडली. हिंदुस्थानकडे परिषदेचे यजमानपद आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे एससीओ परिषदेत व्हर्च्युअली सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, एससीओ परिषद ही कुटूंबाची बैठक म्हणून आपण पाहतो. प्रदेशाची सुरक्षा, आर्थिक विकास, एकता, सार्वभौमत्व, अखंडतेचा आदर, पर्यावरण संरक्षण हे एससीओचे आधारस्तंभ आहेत.
एससीओ देशांनी दहशतवादावर टीका करावी
यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. एससीओ देशांनी दहशतवादाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेऊ नये. दहशतवादाविरुद्ध एकत्र लढावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. पाकिस्तानचे नाव न घेता मोदी म्हणाले, काही देश सीमेपलीकडे दहशतवादाचा वापर त्यांच्या स्टेट धोरणांप्रमाणे करत आहेत. हे देश दहशतवादाला आश्रय देतात. अशा देशांवर एससीओने टीका करणे टाळू नये. जागतिक शांततेला दहशतवादाचा धोका आहे.
अफगाणिस्तानबाबत चिंता
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानबाबत चिंता व्यक्त केली. अफगाणिस्तानातील जनतेच्या कल्याणासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल. अफगाणिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी हिंदुस्थानने दोन दशकांपासून योगदान दिले आहे. हिंदुस्थानकडून मानवतेच्या दृष्टीने मदत पाठविली जात आहे, असे त्यांनी सांगितले.




























































