
पाकिस्तान सुपर लीग 2026 च्या हंगामाला गुरुवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरुवात झाली. मात्र, मैदानावर प्रेक्षकांची अनुपस्थिती आणि चेंडूचा बदललेला रंग या दोन गोष्टींमुळे हा सामना चांगलाच चर्चेत राहिला. सलामीच्या लढतीत शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्स संघाने मार्नस लॅबुशेनच्या हैदराबाद किंग्समन संघावर 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र या लढतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आंतरराष्ट्रीय फजिती झाल्याचे पाहायला मिळाले.
गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावादरम्यान पांढऱ्या चेंडूचा रंग हळूहळू गुलाबी आणि नंतर गडद लाल झाला. खेळाडू चकाकी टिकवण्यासाठी चेंडू आपल्या जर्सीवर घासतात, मात्र हैदराबाद किंग्समनच्या लाल रंगाच्या जर्सीचा रंग चेंडूला लागल्याने ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली. टीव्ही कॅमेऱ्यातही चेंडूचा बदललेला रंग स्पष्टपणे दिसत होता. यामुळे काही काळ हा सामना ‘पिंक बॉल’ टेस्टसारखा वाटू लागला. प्रकाशझोतात चेंडूच्या दृश्यमानतेबाबत आणि खेळाच्या निपक्षपातीपणाबद्दल प्रश्न उपस्थित झाले. हैदराबाद किंग्समनचे नेतृत्व करणाऱ्या मार्नस लॅबुशेनने दुसऱ्या षटकापासूनच पंचांकडे तक्रार केली होती.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, मी दुसऱ्या षटकानंतरच पंचांना विचारलं की हे काय चाललं आहे? चेंडू तर लाल झालाय. जर्सीच्या रंगामुळे हे घडत असावं. मी व्यावसायिक क्रिकेटमध्ये असं कधीच पाहिलं नव्हतं. बॅट किंवा पॅडचा रंग थोडाफार लागणं समजू शकतं, पण कपड्यांचा रंग चेंडूला लागणं हे अजब आहे. आशा आहे की पुढील सामन्यात ही चूक सुधारली जाईल.
Peak Pakistan Super League standards 😭
During the very first match of PSL 11, the ball literally turned pink every time Hyderabad Kingsmen players rubbed it on their kit.
Did they get knockoff kits instead of authentic ones?
International league or gully-level experiment? 🤡 pic.twitter.com/Beq5zhmSkb
— Brutal Truth (@sarkarstix) March 26, 2026
दरम्यान, वादाच्या सावटातही लाहोर कलंदर्सने दमदार खेळ केला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोरने 20 षटकात 199 धावांचा डोंगर उभारला. लाहोरकडून फखर जमान याने सर्वाधिक 53, तर हसीबुल्लाह खान याने नाबाद 40 धावा टोलवल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद किंग्समनचा संघ केवळ 130 धावांत गारद झाला आणि लाहोरने 69 धावांनी मोठा विजय मिळवला. लाहोरकडून उबेद शाह, सिकंदर रझा आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
मध्य पूर्वेतील संकटामुळे 2026 चा PSL हंगाम रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. तसेच ही स्पर्धा केवळ लाहोर आणि कराची या दोनच शहरांत मर्यादित आहे. अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलला पसंती देत या स्पर्धेतून माघार घेतल्याने आधीच लीगच्या दर्जावर प्रश्नचिन्ह असताना आता जर्सी कलर प्रकरणामुळे पीएसएलच्या व्यवस्थापनावर टीका होत आहे.




























































