
राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला त्यांच्या क्रिकेट संघाने रविवारी जल्लोष करण्याची संधी दिली. श्रीलंका संघाने किताबी लढतीत पाकिस्तानला 23 धावांनी धूळ चारून सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. भानुका राजपक्षेची (नाबाद 71) वादळी अर्धशतकी खेळी, प्रमोद मदुषणची भन्नाट गोलंदाजी आणि वानिंदू हसरंगाची अष्टपैलू कामगिरी ही श्रीलंकेच्या विजयाची वैशिष्टये ठरली.
श्रीलंकेकडून मिळालेल्या 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून पुन्हा एकदा मोहम्मद रिझवाननेच सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. त्यानंतर इफ्तीखार अहमद (32) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने पाकिस्तानला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. श्रीलंकेकडून प्रमोद मदूषणने सर्वाधिक 4, तर वाणींदू हसरंगाने 3 बळी टिपले. चमीका करुणारत्नेने 2, तर महिश थिक्षणाने एक गडी बाद केला.
श्रीलंकेने पाकिस्तानचा धुव्वा उडवून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा षटकार ठोकला. टीम इंडियाने सर्वाधिक सात वेळा या मानाच्या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. मात्र, यंदाच्या आशिया चषकात सुपर-4 फेरीतच हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानने दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे.





























































