पाकिस्तानला दुसरा आर्थिक धक्का; मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱ्या 50 कोटी डॉलर्स किमतीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी

india pakistan banned

आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला दुसरा आर्थिक धक्का दिला आहे. मध्यस्थ राष्ट्रांद्वारे होणाऱया 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 50 कोटी डॉलर्स किमतीच्या पाकिस्तानी उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे.

पाकिस्तानातील फळे, सुका खजूर, कापड, सोडा, राख, रॉक सॉल्ट आणि चामडे अशा वस्तूंची पुन्हा पॅकिंग आणि रिलेबलिंग करून या वस्तू हिंदुस्थानी बाजारपेठेत आणण्यासाठी तयार असल्याचे समजते.

पाकिस्तानी सैन्याकडून सलग अकराव्या दिवशीही रात्रभर गोळीबार सुरू होता. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले.

या देशांच्या माध्यमातून होणार होती आयात

पाकिस्तानी उत्पादनांची आयात संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका यांसारख्या तिसऱया किंवा मध्यस्थ राष्ट्रांकडून हिंदुस्थानात होणार होती. मात्र, पाकिस्तानचे हे षड्यंत्र हाणून पाडले. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने सर्व पाकिस्तानी आयातींवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. तसेच तिसऱया देशातून केल्या जाणाऱया आयातीवरही कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे.

सैंधव मीठाच्या ऑर्डर्स रद्द

हिंदुस्थानातील व्यापाऱ्यांनी सैंधव मिठाच्या ऑर्डर्स रद्द केल्या असून नव्या ऑर्डर देणेही बंद केले आहे. पाकिस्तानातून सैंधव मीठ, खजूर, काळे मनुके आणि सब्जा आयात करण्यात येत होते अशी माहिती चेंबर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अशोक लालवाणी यांनी दिली. दरम्यान, आता दुसऱ्या देशाच्या मार्गे यांची आयात होईल. मात्र, यामुळे खर्च वाढणार असून, याचा प्रभाव किंमतींवर पडणार आहे. असे असले तरीही देशाच्या हितासाठी संपूर्ण व्यापारी वर्ग सरकारच्या या निर्णयात साथ देणार आहे.