साधू, संतांच्या वेषात पाकिस्तानी गुप्तहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबा, साधू, संतांच्या वेषात पाकिस्तानी गुप्तहेर फिरत असून ते लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे जवानांनी सावध राहावे, असा इशारा लष्कराने जवानांना दिला आहे.

लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेली गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी आता पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने नवीन मोडस ऑपरेंडी आखली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भोंदू बाबा, साधू आणि संतांबरोबर संवाद साधताना सावध राहावे, कोणतीही गोपनीय माहिती सांगू नये, असा इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर 150 पाकिस्तानी हेर

सोशल मीडियाचा वापर करून खोटे मीडिया प्रोफाईल बनवले जात आहेत. त्यातून हिंदुस्थानी जवांना लक्ष्य केले जात आहे. यू टय़ुब, व्हॉट्सऍप आणि स्कॉईप सारख्या माध्यमांचा वापर करताना सावध राहावे. कोणतीही गोपनीय माहिती सांगू नये, अशी सूचना जारी केली आहे. सोशल मीडियावर 150 पाकिस्तानी हेर नाव बदलून जवानांकडून माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय लष्कराला आहे.

हनी ट्रपचा धोका

जवानांकडून गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना महिलांच्या नावाने खोटे प्रोफाईल बनवत आहेत. अशा प्रकारच्या हनीट्रपच्या माध्यमातून जवानांना जाळय़ात ओढण्यात येत आहे. त्यामुळे फोटो, व्हिडिओ शेअरिंग, इन्स्टेंट मॅसेजिंग, डेटिंग आणि सोशल नेटवर्कशी जोडलेल्या ऍपपासून सावध राहावे, असेही लष्कराने म्हटले आहे.

सैन्याची कोणती माहिती असते गोपनीय

सैन्याची सगळीच माहिती गोपनीय असते. सैन्य एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी कधी जाणार, त्यांची तैनाती, त्यांची रचना, त्यांच्या तुकडीतील बलाबल ही माहिती संवेदनशील असते. अशी माहिती मिळवून त्याचा वापर लष्कराविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जातो. याबरोबर सैन्यातील अधिकारी, त्यांचे फोन नंबर मिळवून हॅकिंग किंवा अन्य माध्यमातून अशा अधिकाऱयांवर लक्ष्य ठेवले जात आहे.