पाकच्या सैन्य अधिकाऱ्याने महिला पत्रकाराला मारला डोळा, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानात एका पत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार अबसा कोमल यांना डोळा मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. वापरकर्त्यांनी चौधरी यांच्या या वर्तनाला चुकीचे ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इमरान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या देशविरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका या आरोपांबाबत प्रश्न विचारत असताना हा प्रसंग घडला.

चौधरी यांनी उत्तर देताना इमरान खान यांची खिल्ली उडवत म्हटले, “एक आरोप अजून लिहा ते ‘ज़ेहनी मरीज़’ आहेत, अशी टिप्पणी केली आणि तत्क्षणी पत्रकाराकडे पाहत डोळा मारला. हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ मानसिकदृष्ट्या आजारी किंवा मानसिक स्थिती ठीक नसलेला व्यक्ती असा होतो. हा शब्द प्रामुख्याने अपमानास्पद अर्थाने वापरला जातो. या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित झाले की, “एका गणवेशधारी वरिष्ठ अधिकाऱ्याने सार्वजनिक मंचावर असे वर्तन कसे करू शकते?”

लेफ्टनंट जनरल चौधरी हे यापूर्वीपासूनच हिंदुस्थानविरोधी वक्तव्ये आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर टीका करण्यासाठी चर्चेत असतात. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही वादग्रस्त मानली जाते. ते सुल्तान बशीरुद्दीन महमूद यांचे पुत्र असून, त्यांचे नाव पूर्वी दहशतवादी कारवायांशी आणि ओसामा बिन लादेनच्या संपर्काशी जोडले गेले होते.

अलीकडील दिवसांत चौधरी यांनी पुन्हा एकदा इमरान खान यांच्यावर तीव्र हल्ला चढवला होता. एका पत्रकार परिषदेत त्यांनी खान यांना “अहंकारी” आणि “मानसिकदृष्ट्या आजारी” असे संबोधले होते. तसेच खान जाणूनबुजून पाकिस्तानच्या सशस्त्र दलांविरुद्ध कथित चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांनी इमरान खान यांच्या काही सोशल मीडिया पोस्ट दाखवत म्हटले की, या पोस्टना भारतीय माध्यमे, भारताशी संबंधीत सोशल मीडिया अकाउंट्स आणि अफगाण नेटवर्क जाणीवपूर्वक बुस्ट करत आहेत.