पालम – लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात, फेरफारीसाठी मागितली होती लाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेरफार करण्यासाठी पैशाची मागणी करत अडवणूक करणाऱ्या लाचखोर तलाठ्याविरुद्ध कारवाईचा फार्स आवळण्यात आला. पालम शहरात आज 9 मार्च लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कार्यवाही केली.

पालम तालुक्यातील सायळा येथील एका शेतकऱ्यांचा वाटणी फेर करायचा होता. तो करण्यासाठी आरखेड सजाचे तलाठी सचिन सरोदे यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे लाचेची मागणी केली. ती देण्याची इच्छा नसल्याने या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तदनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला.

त्यात लाच स्वीकारताना तलाठी सरोदे जाळ्यात अडकला. पालम शहरातील तलाठी सरोदे यांच्या खोलीवर दुपारी 3 वाजता ही कार्यवाही करण्यात आली. गंगाखेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बियरबार लगत तलाठी सरोदे यांची खोली आहे. तूर्तास पालम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.