
सामना ऑनलाईन । पालघर
हवामान खात्याने येत्या 48 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. 6 ऑक्टोबर दरम्यान वातावरणात बदल होऊन समुद्र खवळण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. याचा फटका किनाऱ्यालगतच्या भागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभुमिवर पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व तटरक्षक दल, मच्छीमार बांधव तसेच समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्याकडून जिल्ह्यातील वसई, वालीव, अर्नाळा, विरार, सफाळे, पालघर, सातपाटी, केळवे, तारापूर, वाणगाव, आणि डहाणू पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.


























































