पंढरपूरकरांवरील पुराचा धोका टळला, उजनीच्या विसर्गात 10 हजार क्युसेकने घट; दगडीपुलासह 6 बंधारे पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन दिवसांपासून भीमा नदीपात्रात उजनी धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. मात्र, शनिवारी दुपारनंतर विसर्गात दहा हजार क्युसेकची घट करण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य पुराचा धोका टळला आहे. मात्र, पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत 64 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने दगडीपूल, 6 बंधारे पाण्याखाली आहेत, तर पुंडलिक मंदिरांसह विष्णुपद मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात गुरुवारी (दि. 8) दुपारी 61 हजार 600 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता, तो शुक्रवारीदेखील कायम होता, तर शनिवारी उजनी धरणातील विसर्गात 10 हजार क्युसेकची कपात करत 51 हजार 500 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणातून 1950 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीपात्रातील दगडीपूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक व पायी वर्दळ बंद करण्यात आलेली आहे. 50 हजार क्युसेकला दगडीपूल पाण्याखाली जात आहे. सध्या पंढरपूर येथे 64 हजार क्युसेकने विसर्ग आहे, त्यामुळे दगडीपूल पाण्याखाली गेला आहे. वाढत्या विसर्गामुळे दगडी पुलासह नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱयांवरून होणारी वाहतूक बंद पडली आहे.

चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या 42 गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये. प्रशासनास सहकार्य करावे.

– सुशील बेल्हेकर, तहसीलदार, पंढरपूर.