पंढरपूर – लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी ठरतेय अन्नपूर्णा

514

सध्या राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत ‘शिवभोजन’ थाळी हातावर पोट असणाऱ्या शेकडो गोरगरीब कुटुंबाची अन्नपूर्णा झाली आहे. पाच रुपयात पोटभर जेवण मिळत असल्याने गरजूंना या थाळीचा फार मोठा आधार झाला आहे.

महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही या संकल्पनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी योजना सुरु केलेली होती. 10 रुपयात चांगल्या प्रतिचे पोटभर जेवण मिळत असल्याने या थाळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कोरोनाचे संकट आले आणि देश लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. याचा सर्वात जास्त फटका बसला ज्याचे हातावरचे पोट आहे त्यांना. हाताला कामच नसल्याने पैसा नव्हता आणि पैसा नसल्याने चूल पेटणे मुश्किल झाले होते.

लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या पोटाचे हाल होणार हे गृहीत धरुन मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुकास्तरावर शिवभोजन थाळी सुरु करण्याचे निर्देश दिले. पंढरपूर शहरात तीन ठिकाणी ही केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या तिन्ही केंद्रातून 350 लोकांच्या पोटाची भूक शमविली जात आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेले वारकरी भाविक, निराधार आणि गोरगरीब कुटुंब याचा लाभ घेत आहेत. या थाळीची किंमतही कमी करण्यात आली असून पाच रुपयात पोळी भाजी, भात, वरण आदी देण्यात येत असल्याने लोकांना फार मोठा आधार मिळाला आहे. लोकांच्या मागणीनुसार ही केंद्र आणि थाळी वाढविणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या