
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांकडून प्रचाराचा झंझावात राबवला. गुरुवारी (दि. 15) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराने मतदारसंघ पिंजून काढला आहे. गेले 12 दिवस आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खरी लढत होत असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शैला गोडसे व सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. याचा फटका कोणाला बसणार हेही पाहावे लागणार आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंढरपुरात सभा घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रचाराकरिता येत आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते हे कॉर्नर सभा, दुचाकी रॅलीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
























































