पोटनिवडणुकीची रणधुमाळी, पंढरपुरात 68 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानामुळे मतदारसंघात सरासरी 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्यास सुरुवात झाली. प्रमुख लढत होत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके व भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासह 19 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते. सायंकाळी सहानंतर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या शंभरहून अधिक रुग्णांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती.

अशी राबवली यंत्रणा….

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 262 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग व्यवस्था करण्यात आली होती. तर, 326 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मतदानासाठी 2620 अधिकारी-कर्मचारी यांची, तर 1 हजार आरोग्य कर्मचारी, 1310 राखीव कर्मचारी ठेवण्यात आले होते. आधी मतदान नंतर लगीन असे म्हणत बिजगर्णी गावातील वर-वधू मतदान केंद्रावर आले होते.