आषाढीवारी बाबत अद्याप निर्णय नाही, रद्द केल्याची बातमी अफवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात संचार बंदी सुरू आहे.यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची चैत्र वारी पार पडली.प्रशासकिय सुचनांचा मान राखत यावारी करीता वारकऱ्यांनी संचार बंदी चे उल्लंघन करुन न येता घरी राहूनच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यातून सामाजिक आरोग्य देखील राखले जाईल असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने करण्यात आले होते. त्या आवाहनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद वारकरी बांधवांनी दिला.

मात्र रविवारी एका वृत्तवाहिनीच्याद्वारे “राज्यातील सर्वात मोठा ज्ञानोबा-तुकोबारायांचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे” अशा आशयाची बातमी दिली व त्याच अनुषंगाने काही इतर माध्यमांकडून ही बातमी लावण्यात आली. या प्रकारामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील वारकरी भाविक भक्तांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तर पंढरपुर मध्ये ज्या हजारो कुटुंबांची उपजीविका वारीच्या जीवावर आहे तेही लोक हादरुन गेले.

या प्रकरणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर यांनी तात्काळ या संदर्भात श्रीसंत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख, तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही असे कळाले. यानंतर आम्ही सदर वृत्तवाहिनी प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वृत्त त्वरीत मागे घेत असल्याचे कळवले होते.

आषाढी यात्रेसाठी अद्याप दीड ते पावणेदोन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही सदर बातमी, तसेच या अनुषंगाने लागलेल्या इतर बातम्यांमुळे वारकरी संप्रदायामध्ये विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संदर्भात प्रशासनाकडून आलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करत संपुर्ण सहकार्य करण्याची भूमिका वारकरी संप्रदायातील सर्व घटकांनी घेतलेली आहे व या पुढेही कोरोनासंदर्भातील सर्व सुचनांचे गांभिर्याने पालन करण्याचे सहकार्य राहणारच आहे.

तरी सध्यस्थितीत वारकरी संप्रदाय आतील महाराज मंडळी,पालखी सोहळा प्रमुख, तसेच प्रशासकीय स्तरावर आषाढी वारी रद्द करण्यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसून या संदर्भात प्रसारित झालेल्या बातम्या या केवळ अफवाच आहेत असे या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर करत आहोत.