
सामना प्रतिनिधी । राहुरी
ताहराबादच्या वारकऱ्यांबरोबर गेल्या एक तपापासुन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पांडु श्वानाचा यंदा १३ व्या वर्षीही दिंडीतील सहभाग हे यंदाचे विशेष आकर्षण ठरले आहे.
प्रति पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराज यांच्या दिंडीने बुधवारी राहुरीतुन प्रस्थान ठेवले. टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत आज सकाळी राहुरी शहरात दाखल झालेल्या दिंडीतील वारकऱ्याचे राहुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती अरूण तनपुरे, नगरपरिषदेच्या वतीने प्राजक्त तनपुरे, मुळा प्रवरा विज संस्थेचे संचालक रावसाहेब राधुजी तनपुरे यांनी जल्लोषात स्वागत केले.
दिंडी प्रमुख बाबासाहेब वाळुंज, बाळकृष्ण कांबळे, नाना महाराज गागरे, नारायण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरातुन हरिनामाचा जयघोष करत निघालेली दिंडी पाहण्यासाठी चौकाचौकात भाविकांची गर्दी जमली होती. दिंडीत झालेला शाळकरी मुलांचा पाऊली कार्यक्रम हा लक्षवेधी ठरला. संत महिपती महाराज यांच्या दिंडीत नेहमी प्रमाणे सामील झालेल्या पांडुकडे (श्वान) स्वागतासाठी जमलेल्या भाविकांचे लक्ष वेधले होते. गेली १२ वर्ष दिंडीच्या पुढे असलेल्या भगव्या झेंड्या बरोबर राहुन ताहराबाद ते पंढरपुर या वारीचा साक्षीदार असलेला पांडु (श्वान) वयोमानानुसार थकल्याने पांडुचा यंदाचा प्रवास दिंडीत पाठीमागे चाललेल्या रथाबरोबर सुरू झाला आहे.
आज सकाळी राहुरीतुन प्रस्थान ठेवलेल्या संत महिपती महाराज दिंडीतील वारकरी नगर, रूई छत्तीशी, मिरजगाव, करमाळा देवी, टेंभुर्णी, संगम हा प्रवास करत २२ जुलैला श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पांडुरंगाच्या दर्शनाला दाखल होणार आहे.






























































