जनतेसाठी आता मी मैदानात उतरणार – पंकजा मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्याकडे पद नाही, खुर्ची नाही, तरीही आज जनता माझं भाषण ऐकायला आली आहे. त्यामुळे वेळ पडल्यास कापूस वेचायला जाईन, ऊस तोडायला जाईन पण मेहनतीचं खाईन. माझ्या जनतेसाठी आता मी मैदानात उतरणार. मी पडणार नाही, मी पाडणार, असा इशारा पंकजा मुंडे यांनी बीड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात दिला आहे. आज महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ओबीसी समाज सरकारकडे आशेने पाहतो आहे. आता अपेक्षाभंगाचं दुःख कोणताही समाज सहन करू शकत नाही. सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेरही दिला.

बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे यांनी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा असल्याचं वक्तव्य केलं आहे. गेल्या दसरा मेळाव्यात पंकजा यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा त्या काय म्हणतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. दसरा मेळाव्यासाठी जमलेल्या जनतेला उद्देशून पंकजा म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठा समाजाने, उसतोड कामागारांनी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच माझं स्वागत केलं. सगळ्यांनी केलेलं स्वागत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी त्यासाठी तुम्हा सगळ्यांपुढे नतमस्तक होऊन आभार मानते असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्या पुढे म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे. ओबीसी समाज सरकारकडे आशेने पाहतो आहे. आता अपेक्षाभंगाचं दुःख कुठलाही समाज सहन करु शकत नाही, असं पंकजा यावेळी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या भाषणात शेतमजूरही करणारे लोक आलेत त्यांनाही मजुरी मिळत नाही. ही आज परिस्थिती आहे. उस तोड कामगार आहेत, त्यांना पैसे वाढवून मिळणार नाहीत तोपर्यंत ते उस तोडायला जाणार नाही. सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईपर्यंत मी शांत बसणार नाही, असं म्हणतानाच त्यांनी कारखान्यावरील छापेमारीवेळी उभारलेल्या निधीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मी तुम्हाला काय दिलं? तुम्ही उन्हात बसला आहात म्हणून स्टेजही उन्हातच बांधलं आहे. एकवेळ मला काही मिळालं नाही तरी चालेल पण तुम्हाला तुमचा हक्क मिळाला पाहिजे, असं मुंडे यावेळी म्हणाल्या.

दरवेळी तुम्ही आशा लावता आणि तुमचा माझ्याकडून अपेक्षाभंग होतो. मी हात जोडून तुमची माफी मागते. निवडणुकीत पडले तर पडले. पण आपल्यात फक्त निष्ठा आहे. शिवशक्ती परिक्रमेनंतर मला साक्षात्कार झाला. त्यानंतर जनतेने मला जितकी मदत केली त्यावरून जनतेची मी कर्जदार असल्याचं मला कळून चुकलं. त्यामुळे आता माझी निष्ठा, माझं सर्वस्व हे जनतेचं आहे. पाच वर्षांत मी प्रचंड काम केलं. लोकांच्या मनात आता प्रश्न आहेत. त्याचं उत्तर मला माहीत आहे. मी तुमची आई आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. कुणाचं दुसऱ्याचं हडपून खाणं हे माझं कर्तव्य आहे. कारण, मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही, असंही त्या वेळी म्हणाल्या.

माझ्याकडे पद नाही, खुर्ची नाही.. तरीही तुम्ही माझ्यासाठी आला आहात तेव्हा वेळ पडल्यास कापूस वेचायला जाईन, ऊस तोडायला जाईन, पण मेहनतीचं खाईन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या जनतेसाठी मी आता मैदानात उतरणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं. यावेळी मी पडणार नाही, मी पाडणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.