
पाठीत वार करणे हा माझा स्वभाव नसून मी संयमी असल्याने, तुम्ही सुद्धा संयम पाळा, असा टोला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला आहे. पाठीत वार करणे आपला स्वभाव नसल्याचे सांगत त्यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे. विधानपरिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे यांनी मंगळवारी मोहटा देवीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे.
या वेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, अरुण मुंडे, मोहटा देवस्थानचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे,अशोक विक्रम दहिफळे,अशोक दहीफळे,आजिनाथ आव्हाड हे उपस्थित होते. मुंडे यांचे शहरात त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी व बॅनर्स लावण्यात आले होते.मुंडे यांच्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुकुंद गर्जे याची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. मोहटा देवस्थानच्या सभागृहात बोलताना मुंडे म्हणाल्या की, कोणतेही पद नसताना एवढे भरभरून तुम्ही दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला पद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेला संघर्षाचा वारसा टिकवायला हवा. कोणाचाही अवमान करणे हे मुंडेंच्या रक्तात नाही. येथून पुढे पुन्हा एकदा मी राज्याच्या दौरा करत जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे. माझ्या पेक्षा छोट्या कार्यकर्त्याला संधी व पदे मिळाली म्हणून माझ्या पोटात गोळा आलेला नाही. माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. तुमच्या सारखे कार्यकर्तेच माझी कवचकुंडले असून तुमच्यासाठी मी संयमाने प्रत्येक पाऊल उचलत असल्याचे मुंडे म्हणाल्या.



























































