इथे पुसट होते गडकरींच्या कामाची ओळख ; परळी-पिंपळा रस्त्याचे काम संथगतीने

448

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रोडकरी म्हणून असलेली प्रतिमा परळी-पिंपळा(धायगुडा) या रस्त्याच्या कामामुळे पुसल्या जाण्याची शक्यता आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेला हा रस्त्याचा कामाचा अर्धा कालावधी उलटूनही या रस्त्याचे अर्धेही काम न झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तसेच प्रवाशांची मोठी हेळसांडच होत आहे.दोन्ही बाजूने उकरून ठेवलेला रस्ता याचे मुख्य कारण आहे.

पूर्वीचा राज्य रस्ता क्र.६४ आताचा ५४८- ब राष्ट्रीय महामार्ग परळी – पिंपळा (धायगुडा) या रस्त्याचे कामाची सुरुवात गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०१७ या दिवशी सुरू झाले होते.१८ किमीच्या रस्त्याचे काम सुनील हायटेक इंजिनिअर लि.,आर.सी.एम. इन्फ्रास्ट्रक्चर लि.या कंपन्यांना देण्यात आले.यासाठी तब्बल १३४ कोटी ४५ लाख इतक्या किमतीचे हे काम होते.हे काम २४ महिन्यात पूर्ण करायचे आहे.ऑक्टोबर महिन्यात या कामाला एक वर्ष होत असताना हे काम ५० टक्केही झालेले दिसत नाही.परळी-अंबाजोगाई परिसरात पाऊस कमी झाल्याने या रस्त्यावर दुचाकी छोटी वाहनांसाठी वाहतूक करणे शक्य होते.मात्र या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धुळीचा सामना करावा लागला.

आता परतीचा पावसाने या रस्त्यावर वाहने चालवणे देखील मोठे कठीण होऊन बसले असून दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळाच होऊन बसला आहे.या रस्त्यावर शेकडो दुचाकीचे अपघात झाले असून,दोन बसचेही अपघात झालेले आहेत.या रस्त्याचे सुरू असलेले कामाबाबत कुठेही सूचना फलक लावल्याचे दिसून येत नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजू उकरून ठेवल्याने या रस्त्यांवर वाहने चालवणेच कठीण होऊन बसले आहे.अंबाजोगाई शिक्षणासाठी जा-ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने या रस्त्याला मोठे महत्व आहे.कामाचा अर्धा वेळ उलटूनही चार पदरी असलेला हा रस्ता अर्धा म्हणजे एकपदरीही झालेला दिसत नाही.आपल्या कामाची दररोज नोंद घेणाऱ्या केंद्रीय रस्तेविकास मंत्रालयाने रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्यांवर कुठली कारवाई केल्याची माहिती भेटू शकलेली नाही.परळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काकड यांना याबाबात माहिती विचारली असता या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग निर्माण विभागाचे कार्यालय लातूर यांच्याकडे चौकशी करण्याचा सल्ला देत त्यांनी उडवाउडवी केली.

आपली प्रतिक्रिया द्या