परमबीर सिंग यांची ’लीलावती’च्या संचालकपदावरून हकालपट्टी, लाचखोरी आणि धमक्यांचे आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून प्रमोशनसाठी 25 लाखांची मागणी, धमक्या आणि डय़ुटीच्या वेळी मद्यपान करून येणे, असे आरोप परमबीर यांच्यावर रुग्णालय संचालकांकडून करण्यात आले आहेत.

पोलीस दलातून निवृत्त झालेल्या परमबीर सिंग यांची जुलै 2024 मध्ये लीलावतीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यकाळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्याची माहिती लीलावतीचे ट्रस्टी राजीव मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कनिष्ठ डॉक्टरांना थेट बढती देण्याच्या बदल्यात 25 लाखांची मागणी केल्याच्या तक्रारी आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांची चौकशी आम्ही करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्या विरोधात पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सिंग यांनी वेळोवेळी डॉक्टरांना धमकावल्याचा आरोपही राजीव मेहता यांनी केला आहे. रुग्णालयाचे इतर दहा विश्वस्तही त्यांच्या विरोधात आहेत, असा दावा मेहता यांनी केला. सिंग यांच्या पदाची मुदत पाच वर्षे होती. तत्पूर्वीच, त्यांना हटवण्यात आले आहे.

हकालपट्टीच्या निर्णयाला आव्हान देणार

परमबीर सिंग यांनीही विरोधी गटातील विश्वस्तांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर 1200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. शिवाय हकालपट्टीच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

कर्माचे फळ मिळाले!

परमबीर सिंग यांच्यावरील कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ पोस्ट करून प्रतिक्रिया दिली. ‘अखेर या माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले याचा आनंद वाटतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.