बिहारमध्ये गोळीबार, गावठी बॉम्बहल्ले सुरूच; निमलष्करी दलाच्या 10 तुकडय़ा तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी सुरू झालेला हिंसाचार थांबलेला नसून पाच जिह्यांमध्ये गोळीबार आणि गावठी बॉम्बहल्ले सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात एक जण ठार तर 30 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 125 हून जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराला रोखण्यासाठी निमलष्करी दलाच्या 10 तुकडय़ा तैनात केल्या आहेत.

बिहारच्या बिहार शरीफ, सासाराम, भागलपूर, गया आणि मुंगेर या पाच जिह्यांमध्ये रामनवमीवेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रांनंतर सुरू झालेला हिंसाचार सुरू आहे. बिहार शरीफ आणि सासाराममध्ये गेल्या दोन दिवसांपासून गोळीबाराच्या घटना आणि गावठी बॉम्बहल्ले सुरू आहेत. नालंदामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. मुंगेरमध्ये शनिवारी मूर्ती विसर्जनासाठी दोन गटांमध्ये दंगल झाली. यात दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली, मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सासाराममध्ये शनिवारी गावठी बॉम्बस्फोटामध्ये सहा जण जखमी झाले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकडय़ा पाठवण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.