शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या, मोंढा पोलिसांची कारवाई

परभणी शहरातील वसमत रस्त्यावरून रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍याला 5 व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना बुधवार मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी इतर आरोपींचाही शोध लावला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भालेराव कॉम्प्लेक्समधील विद्यार्थी नारायण व्यंकटेश हजारे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पायी रेल्वेस्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी (एम.एच. 22 ए.पी. 1504) क्रमांकाच्या अ‍ॅटोतून आलेल्या व्यक्तींनी हजारे यास रस्त्यावर अडवून अ‍ॅटोतील दोघांनी त्याचे हात धरत शस्त्राचा धाक दाखवला. खिश्यातील 1 हजार 300 रुपयांसह मोबाईलही बळजबरीने काढून घेतला. यावेळी हजारे यांनी लुटणार्‍यापैकी एकाला धरून ठेवत विरोध केला. त्याचवेळी गस्तीवरील नवामोंढा पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाल्याने अन्य लूटारू तेथून पळून गेले. परंतु एकाला धरून ठेवल्याने मोंढा पोलिसांनी अन्य आरोपींचा तातडीने शोध सुरू केला. पो. नि. रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गायकवाड, जाधव यांच्यासह कर्मचार्‍यांनी तात्काळ हालचाली करीत अन्य दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील लक्ष्मण शिंदे, गणेश शंकर वाकळे, प्रदीप कृष्णा कापडे यांच्यासह अन्य दोघांनी लुटल्याचे हजारे यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या