सेलू – रायपूर शिवारात आढळला वाघ, घटनास्थळाजवळ सापडले मृत हरीण

603

रायपूर शिवारात वाघ दिसल्याच्या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. सदरील घटनेतील प्राणी हा तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. परंतु जे प्रत्यक्ष या घटनेचे साक्षीदार आहेत ते मात्र आम्ही पाहिला तो वाघच होता, या मतावर ठाम आहेत. त्यातच सोमवारी रात्री घटनास्थळाजवळच जंगली प्राण्याने शिकार केलेले मृत हरीण सापडल्याने तो प्राणी खरच वाघ आणि की तरस आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

येथील स्थानिक रहिवासी वैभव गाडेकर हे सेलू साळेगाव रस्त्याने सायंकाळी सातच्या सुमारास जात होते. यावेळी दोन मोटारसायकलवर वैभव, त्याची आई व दुसऱ्या गादीवर वडील व आणखी एक जण असे चौघे जण जात असताना रस्त्याच्या बाजूलाच त्यांना एक मोठा वाघ दिसला. एकदम वाघ दिसल्याने गाडेकर यांना काहीच समजले नाही व ते पूर्णपणे घाबरून गेले. परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी आपली गाडी तशीच रायपूर पर्यंत नेली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाला भेट दिली. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सापडलेल्या विष्ठेवरून तो प्राणी तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. अजूनही वनविभागाचे वनपाल व इतर कर्मचारी रायपूर परिसरात गस्त घालत आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री घटनास्थळाजवळच जंगली प्राण्याने शिकार केलेले मृत हरीण सापडल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. त्या हरणाच्या मृत शरीरावरुन शिकार करण्याच्या पद्धतीवरून तरी तो प्राणी तरस असल्याचे दिसत आहे. परंतु अद्यापही वनविभागाला तरस हा प्राणी देखील दिसला नसल्याने तो वाघ आहे की तरस हा संभ्रम निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या