परेश रावल होणार पंतप्रधान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
paresh rawal

सामना ऑनलाईन । मुंबई

शीर्षक वाचून गोंधळात पडला असाल, तर जरा थांबा. ही बातमी वेगळी आहे. बॉलिवूडमध्ये सध्या पॉलिटिकल बायोपिकचा ट्रेंड रुजतोय. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट येऊ घातले आहेत. या नावांमध्ये अजून एक नाव समाविष्ट झालं असून ते नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं.

नरेंद्र मोदी यांच्यावर चरित्रपट येत असून त्यात मुख्य भूमिकेत परेश रावल दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या चरित्रपटाच्या पटकथेची तयारी सुरू झाली असून यंदाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होईल. या चित्रपटाची निर्मिती खुद्द परेश रावल करत असल्याचीही चर्चा सुरू आहे. रावल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासाठी पंतप्रधानांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवणं हे एक खूप मोठं आव्हान असणार आहे. या चित्रपटाचं नाव काय असेल, तसंच अन्य महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये कोणते कलाकार असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येणाऱ्या ठाकरे या बहुचर्चित चित्रपटात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी मुख्य भूमिकेत असणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावरील चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता या तीन राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर चित्रपट येत असल्यामुळे आता भविष्यात अन्य नेत्यांवरही असे चित्रपट साकारले जाण्याची शक्यता आहे.