
संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज ही माहिती दिली. या अधिवेशनात एपूण 15 बैठका होतील. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी बिहारमध्ये नवे सरकार सत्तेवर आलेले असेल. त्याचे पडसाद या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 18 ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली होती. त्या बैठकीतच व्होटचोरीच्या मुद्दय़ावर गांभीर्याने चर्चा झाली होती. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीमुळे निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला धक्का बसला असून व्होटचोरी करूनच भाजप सत्तेवर आली असे वातावरण आहे. त्याचा पुरेपूर फायदा विरोधक उठवतील.



























































