आज खंडग्रास चंद्रग्रहण

110

सामना ऑनलाईन, मुंबई

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण उद्या, 16 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण हिंदुस्थानातून दिसणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण जवळपास तीन तास राहील.

खंडग्रास चंद्रग्रहणाचा प्रारंभ मंगळवारी उत्तररात्री 1 काजून 32 मिनिटांनी होईल. ग्रहणमध्य उत्तररात्री 3 वाजून 1 मिनिटांनी होईल. त्यावेळी 65.3 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये येईल. त्यानंतर उत्तररात्री 4 वाजून 30 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

उद्याचे खंडग्रास चंद्रग्रहण सरॉस चक्र क्रमांक 139 मधील आहे. ते हिंदुस्थानसह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून दिसेल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असले तरी गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे साजरी करता येईल, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध नऊ तास आधी सुरू होतात, तर सूर्यग्रहणाचे वेध 12 तास आधी सुरू होतात. 16 जुलै रोजी  खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या