पार्टीगेट प्रकरणी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी माफी मागितली, दंड भरून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सुटका करून घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत यूकेच्या पंतप्रधान कार्यालय ‘डाउनिंग स्ट्रीट’ आणि सरकारी कार्यालयांमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाउन मध्येच आयोजित केलेल्या या पार्टीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. देशात पार्टीगेट म्हणून ओळखली जाणारी हि पार्टी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना चांगलीच भोवली आहे.

मंगळवारी बोरिस जॉन्सन यांनी स्कॉटलंड यार्डने ठोठावलेला दंड भरला तसेच कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली. ‘डाउनिंग स्ट्रीट’मध्ये पार्टी आयोजित केल्याबद्दल मी दंड भरला आहे आणि मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो असे यावेळी जॉन्सन यांनी बकिंगहॅमशायरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी जॉन्सन यांना संसदेत देखील माफी मागावी लागली.

जॉन्सन आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांना फिक्स्ड पेनल्टी नोटीस जारी केली जाणार असल्याची माहिती मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून मिळाली होती. याबद्दल ब्रिटिश पंतप्रधान कार्यालय, डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी देखील माहिती दिली होती.

पारदर्शक कारभाराच्या अनुषंगाने बोरिस जॉन्सन यांची पत्नी, कॅरी जॉन्सन यांना देखील अशा प्रकारची नोटीस प्राप्त होणार आहे. त्यांच्या प्रवक्त्यांच्या सांगण्यानुसार कॅरी जॉन्सन यांना फिक्स्ड पेनल्टी नोटीस प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु यासंदर्भात त्यांना अद्याप कोणतेही अधिक तपशील मिळालेले नसल्याचे ते म्हणाले.