
सामना प्रतिनिधी । नगर
नगरच्या भाजपाच्या मनपाच्या प्रचारसभेत मंत्री पंकजा मुंडे यांच्याच जाहीर सभेमध्ये भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांना खडेबोल सुनावण्यात आले. पार चढलेल्या गांधीनी त्यालाही चोख उत्तर देत गटारीची कामे खासदार करत नाही, असे सांगून सदरचा प्रकार जाहीर सभेत घडल्यामुळे भाजपाअंतर्गत कुरघोडी कशा पध्दतीने सुरु आहे हे आता उघड झाले आहे.
मुंडेंसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका साहेब, मुंडेसाहेब समाजकारण करत होते. मुंडेसाहेबांनी कधीही राजकारण केलं नाही. आतापर्यंत तुम्ही 10 वर्षे खासदार होते. पण, आतापर्यंत एकदाही तुम्ही आमच्या सारसनगर भागात आला नाहीत, अशा शब्दात सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने खासदार दिलीप गांधी यांना खडे बोल सुनावले. त्यावर, उलट उत्तर देताना खासदार गांधी यांचाही पारा चढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
नगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचारांचा झंझावत सुरू आहे. या प्रचारासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. त्यावेळी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सारस नगर येथील भगवान बाबा चौकात सभा सुरू असताना एका कार्यकर्त्याने भरसभेत भाजपा खासदाराला खडे बोल सुनावले. तसेच मुंडेसाहेबांच्या नावावर राजकारण करू नका, असा सल्लाही दिला. त्यानंतर, खासदार गांधी यांनाही राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. विकास काय करायचा हे आम्हाला माहित आहे, खासदारानं नगरपालिकेच्या गटारीचं काम करायचं नसतं. आम्हाला माहितीय तुमचं कोणाचं काय दुखतंय ते, अशा शब्दात खासदार गांधी यांनी त्या कार्यकर्त्याला उत्तर दिले. विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या. गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यास गप्प बसण्यास सांगितल्यानंतर तो शांत झाला.
दरम्यान, भाजप अंतर्गत वाद निवडणुकीपासूनच सुरु आहे, आज खुद्द मंत्र्याच्या समोरच असा प्रकार घडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या मंत्र्याच्या देखत असा प्रकार होत असेल तर मागे काय होत असेल अशी चर्चा सुरु झाली आहे.



























































