महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवासी संघटना आक्रमक, दगडफेकीच्या घटनेची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी; विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर-परळदरम्यान लोकल ट्रेनवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेतील मध्य रेल्वेचे अपयश समोर आणले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दगडफेकीच्या घटनेची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत मुंबई रेल प्रवासी संघातर्फे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

प्रवासी सुरक्षा, पायाभूत सुविधा तसेच कोकण रेल्वेसंबंधित प्रश्नांबाबत मुंबई रेल प्रवासी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच अनुषंगाने महिला प्रवासी विभाग उपाध्यक्षा वंदना सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील डीआरएम कार्यालयास भेट दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दादर-परळदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेत महिला प्रवाशाला दृष्टी गमवावी लागली.या घटनेची तातडीने चौकशी व जबाबदारी निश्चित करणे, पीडित महिलेला नुकसानभरपाई व आयुष्यभर वैद्यकीय सहाय्य करणे, ट्रक परिसरात सीसीटीव्ही आणि आरपीएफचे जवान तैनात करणे, महिलांचे डबे मधोमध एकत्र करणे अशा विविध मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्याचा तीव्र निषेध

दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाचा प्रवासी संघातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. सद्यस्थितीत कोकणासाठी केवळ दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर या तीनच गाडय़ा उपलब्ध आहेत. इतर गाडय़ा गोवा, कर्नाटक, केरळसाठी असल्याने तिकीट कोटादेखील इतर राज्यांचाच असतो. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. याचवेळी दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू करावी, पनवेल-चिपळूण दररोज लोकल सेवा सुरू करावी, कोकणासाठी स्वतंत्र तिकीट कोटा निश्चित करणे आदी मागणी करण्यात आल्या.