
राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही उष्णतेने कहर केला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी लोक वातानुकूलित प्रवासाला पसंती देत आहेत. त्यामुळे भुयारी मेट्रो तसेच मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलची प्रवासी संख्या वाढली आहे. सध्या भुयारी मेट्रोतून दररोज सरासरी 1.62 लाख मुंबईकर प्रवास करीत असून मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी संख्या 1.30 लाख आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी मागील पाच महिन्यांतील वातानुकूलित लोकलची प्रवासी संख्या जाहीर केली. उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल ट्रेनमधून 1.50 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. उन्हाळी हंगामात संख्या आणखी वाढल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एसी लोकलमधून दररोज सरासरी 1.30 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मध्य रेल्वेने 26 जानेवारी ते 20 मे 2026 या कालावधीत 8,991 एसी लोकल फेऱ्या चालवल्या. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 6,834 सेवांच्या तुलनेत 31.6 टक्क्यांनी अधिक नोंद झाले. याचवेळी आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील प्रवासी संख्याही उन्हाळ्यात वाढली आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 मे ते 12 मे या कालावधीत भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ नोंद झाली. कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत दररोज 1 लाख 62 हजार 505 मुंबईकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला, तर वीकेण्डला सरासरी 1 लाख 5 हजार प्रवाशांची नोंद करण्यात आली.
























































